असा डॉक्टर होणे नाही

असा डॉक्टर होणे नाही.

तुझ्या मुलाला किती दिवसापासून अंगात ताप आहे? डॉ. लेस्ली घोन्सालवीसना दाखवलंस का? अंगावर नागिण निघाली आहे का? डॉ. लेस्लीकडे कधी जाणार? डॉ. लेस्लीकडे जायचे आहे पण माझा नंबर 150 वा आहे. मला मध्ये संधी मिळेल का? तुझी दवाखान्यात ओळख आहे का? होळीला जात आहे का? डॉ. लेस्लीकडे माझा नंबर काढशील? अशी वाक्ये आता ऐकायला मिळणार नाहीत. ह्याचे कारण तमाम वसईकरांच्या गळ्यातील ताईत, ज्यांच्या स्पर्शज्ञानाने अवघी वसई रोगमुक्त झाली, वसईचे आरोग्यदूत, आरोग्यदाता, तळागाळातील, पददलितांच्या आरोग्याचे कैवार घेऊन अगदी स्वस्तात वैद्यकिय सेवा करणारे, जनसामान्यांचे लाडके असे डॉ. लेस्ली घोन्सालवीस ह्यांचे दुर्धर आजाराने तामिळनाडूतील वेल्लोर येथे काल राञी 10.30 वाजता निधन झाले.

त्यांच्या जाण्याने अवघी वसई नगरी पोरकी झालेली आहे. जणू घरातील कर्ता पुरूष गमावल्याची भावना त्यांच्यात झाली आहे. त्यांचा स्वभाव शांत, कमालीची लोकप्रियता असूनदेखील चेह-यावर गर्वाचा अजिबात लवलेश नव्हता. ते अतिशय साधे होते. दिवसाला साधारणपणे 300 रोगी तपासत असत. एवढे रोगी तपासून सुध्दा उत्साह तोच असायचा. अचूक निदान करून अचूकऔषध देण्यामध्ये त्याचा हातखंडा होता. रामबाण औषध देण्याचे कसब त्यांना ब-यापैकी अवगत होते. रोग्याला मुमबईला नेण्याआधी डॉक्टर लेस्लींचा योग्य सल्ला घेण्याचा जणू पायंडा पडलेला होता. रोग्यांबरोबरचे त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. त्यांचा स्वभाव थोडासा विनोदी होता. त्यांच्याकडे गेल्यावर पहिला प्रश्न कोपात काल काय खालतं शिवणी खालती का?

औषध दिल्यानंतर परत याव नाका असे वाडवली बोलीभाषेत ते सुचवायचे. एकदा औषध दिल्यानंतर सहसा परत बोलावत नसत. आजच्या युगात वैद्यकिय सेवा महागडी झाली आहे. डॉकिटरकडे जायचे म्हटल्यावर हुडहूडी भरते. अशावेळेला डॉक्टर लेस्लीसारखे देवमाणसं भेटतात जे रुग्णाला मदतीचा हात देऊन रोगमुक्त करतात. डॉ. लेस्ली ह्यांची जगण्याची आशा तीव्र होती.

प्रार्थना सभेमध्ये ते सक्रिय होते. आजारपणातून ते बरे व्हावेत म्हणून प्रार्थना व्हायच्या. शेवटी नियतीपुढे कोणाचेही काहीही चालत नाही हेच कटूसत्य आहे. ज्याने अनेकांना नवसंजीवनी दिली, ज्याने अनेकांना जगण्याची उमेद जागवली त्यालाच मृत्यूने अखेर गाठलेच. असा हा सच्च्या मनाचा अवलिया आपणा सर्वांचा निरोप घेऊन अनंताच्या प्रवासाला निघाला परत कधीही न येण्यासाठीच. जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला. ह्या भूतलावर डॉक्टरांनी फक्त प्रेम आणि प्रेमच पेरलेले आहे. अशा महान विभूतीला कोटी कोटी प्रणाम. तथास्तु. हे परमेश्वरा, आमच्या लाडक्या लेस्ली डॉक्टरांना तुझ्या शाश्वत नंदनवनात तू समाविष्ट कर. तथास्तु.

आपलाच: विनय अंतोनी डिमेलो.

Leave a Reply